चष्मा असेल किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल, तरी नेत्रदान करता येतं? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

नेत्रदान केल्यावर चेहरा विद्रूप होतो? पुढच्या जन्मात अंधत्व येतं?

फोटो स्रोत, Getty Images

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा कुटुंबासाठी अत्यंत दुःखाचा क्षण असतो. मात्र, याच क्षणी घेतलेला एक निर्णय दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात शब्दशः प्रकाश आणू शकतो.

नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर डोळ्यांतील कॉर्निया दान करणं. डोळ्याचा हा पारदर्शक भाग खराब झाल्यानं अनेक लोकांना दृष्टी गमवावी लागते. अशा रुग्णांवर कॉर्निया प्रत्यारोपण करून त्यांची दृष्टी पुन्हा मिळवून देण्याची शक्यता असते.

भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अशा कॉर्नियाची गरज असते, पण तुलनेत त्याची उपलब्धता कमी असल्याने अनेक रुग्ण प्रतीक्षा यादीतच राहतात.

नेत्रदानाबद्दल समाजात अनेक गैरसमज आजही कायम आहेत. वय वाढलं असेल, चष्मा लागत असेल, मधुमेह असेल किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तर नेत्रदान करता येत नाही, असा समज अनेकांचा असतो. प्रत्यक्षात मात्र अशा अनेक व्यक्ती नेत्रदान करू शकतात.

मृत्यूनंतर काही तासांच्या आत कॉर्निया संकलित करता येतो आणि या प्रक्रियेमुळे अंत्यसंस्कारांनाही विलंब होत नाही. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्ताने नेत्रदानाशी संबंधित तथ्य, त्यातील आव्हानं आणि त्यातून हजारो लोकांच्या आयुष्यात घडणारा सकारात्मक बदल समजून घेणं आवश्यक ठरतं.

नेत्रदानाबाबत जागरूकता वाढत असली तरी भारतात दरवर्षी आवश्यक असलेल्या कॉर्नियांच्या तुलनेत उपलब्धता खूपच कमी आहे.

तज्ज्ञांच्या मते, कॉर्नियाशी सं���ंधित अंधत्व असलेल्या लाखो रुग्णांना प्रत्यारोपणाची गरज आहे; मात्र पुरेशा प्रमाणात नेत्रदान होत नसल्यानं अनेकांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. यामागे केवळ दात्यांची कमतरता हे कारण नाही, तर नेत्रदानाविषयी असलेले गैरसमज, मृत्यूनंतर त्वरीत निर्णय घेण्यातील अडचणी, ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा आणि जनजागृतीचा अभाव हीदेखील महत्त्वाची कारणं आहेत. अनेकदा नेत्रदान म्हणजे संपूर्ण डोळा काढला जातो किंवा त्यामुळे मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप होतो, असा समज असतो. प्रत्यक्षात प्रशिक्षित तज्ज्ञ अतिशय काळजीपूर्वक कॉर्निया संकलित करतात आणि त्यामुळे चेहऱ्याच्या स्वरूपावर परिणाम होत नाही. याशिवाय, चष्मा वापरणारे, मधुमेह असलेले किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या अनेक व्यक्तीदेखील नेत्रदान करू शकतात. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यासारखे उपक्रम हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात.

भारतातल्या नेत्रदानाच्या स्थितीबद्दल डॉ. हेमंत कांबळे यांनी अधिक माहिती दिली.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. हेमंत कांबळे पुण्यात एएसजी हॉस्पिटल लिमिटेडमध्ये फॅको, रिफ्रॅक्टिव्ह कॉर्निआ अँड ऑक्युलर सरफेस स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. कांबळे सांगतात, "भारतात नेत्रदानाची चळवळ जगातील सर्वात मोठ्या नेत्रपेढी (Eye Bank) नेटवर्कपैकी एक मानली जाते. या चळवळीची सुरुवात 1945 मध्ये चेन्नई येथे देशातील पहिली नेत्रपेढी स्थापन झाल्यानंतर झाली. त्यानंतर तीन वर्षांनी पहिले कॉर्निया प्रत्यारोपण करण्यात आले. आज आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया (EBAI)कडे सुमारे 941 नेत्रपेढ्यांचे आणि नेत्रसंकलन केंद्रांची नोंद आहे."

"2017-18 या वर्षात सुमारे 71,700 दात्यांकडून कॉर्निया संकलित करण्यात आले होते, हा नेत्रदानाचा सर्वोच्च टप्पा होता. मात्र कोविड-19 साथीमुळे या कार्यक्रमाला मोठा फटका बसला. EBAI आणि सरकारी आकडेवारीनुसार, 2023 मध्ये 47,676 कॉर्नियांचे संकलन करण्यात आले आणि त्यापैकी 29,057 कॉर्नियांचा प्रत्यारोपणासाठी वापर झाला. ही संख्या कोरोनापूर्व 2019 मधील 55,260 संकलित कॉर्नियांच्या तुलनेत अजूनही कमी आहे."

डॉ. कांबळे म्हणाले, "भारतात दरवर्षी सुमारे 1 लाख कॉर्निया प्रत्यारोपणांची गरज असते. मात्र प्रत्यक्षात उपलब्ध होणारे दान केलेले कॉर्निया ही गरज भागवण्यासाठी पुरेसे नाहीत. याशिवाय, दान करण्यात आलेला प्रत्येक कॉर्निया प्रत्यारोपणासाठी योग्य ठरत नाही. गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या तपासणीनंतरच त्याचा वापर केला जातो. परिणामी, प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांपैकी केवळ काहींनाच वेळेवर कॉर्निया मिळू शकतो आणि दरवर्षी हजारो नवीन रुग्ण प्रतीक्षा यादीत राहातात."

1. नेत्रदानामध्ये नेमकं काय दान केलं जातं?

नेत्रदानामध्ये प्रत्यारोपणासाठी कॉर्निया हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. कॉर्निया हा डोळ्याच्या पुढील बाजूचा पारदर्शक भाग असतो. प्रकाश केंद्रित करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. संकलनानंतर नेत्रपेढीमध्ये या त्याची काळजीपूर्वक तपासणी करून ते सुरक्षितपणे जतन केले जातात. कॉर्निया प्रत्यारोपणासाठी योग्य आहे हे निश्चित झाल्यावर त्याचं खराब किंवा आजारी कॉर्नियामुळे दृष्टीबाधित झालेल्या रुग्णावर प्रत्यारोपण केलं जातं.

नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी तातडीनं जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीची नेत्रदानाची इच्छा होती, याची माहिती द्यावी. त्यानंतर संकलन पथक वैद्यकीय इतिहास घेते, दान करण्यास ती व्यक्ती योग्य आहे का हे पाहून मग कॉर्निया टिश्यू संकलित करतं.

2. मृत्यूनंतर किती वेळात नेत्रदान करावं?

मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधावा. कॉर्नियाच्या संकलनाबद्दल डॉ. रश्मी बर्वे यांनी माहिती दिली. त्या ठाण्याच्या किम्स हॉस्पिटल येथे नेत्ररोगशास्त्र विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.

त्या सांगतात, " कॉर्निया सामान्यतः 6 ते 8 तासांच्या आत संकलित केला जातो. संकलन पथक येईपर्यंत डोळे अलगद बंद ठेवणं, त्यावर स्वच्छ ओलसर कापूस किंवा गॉज ठेवणं आणि डोके थोडे उंच ठेवणं उपयुक्त ठरतं."

डोळा

फोटो स्रोत, Getty Images

3. नेत्रदान करू शकतं? त्याला वयाची काही मर्यादा आहे का?

नेत्रदानासाठी वयाची निश्चित मर्यादा नाही. वृद्ध व्यक्तीही संभाव्य नेत्रदाता असू शकतात, कारण मृत्यूनंतर कॉर्नियाच्या ऊतींची (टिश्यू) उपयुक्तता तपासली जाते. काही विशिष्ट वैद्यकीय स्थिती किंवा संसर्गामुळे नेत्रदानासाठी व्यक्ती अपात्र ठरू शकते. नेत्रदात्याच्या वैद्यकीय इतिहासा���ा आढावा आणि संकलित ऊतींची तपासणी केल्यानंतर नेत्रपेढी अंतिम निर्णय घेते.

4. नेत्रसंकलनास किती वेळ लागतो?

नेत्रसंकलनाच्या प्रक्रियेबद्दल अनेक गैरसमज असतात तसंच भीतीही असते.

डॉ. रश्मी बर्वे सांगतात, "नेत्रसंकलन ही तुलनेनं कमी वेळात पूर्ण होणारी प्रक्रिया आहे आणि सामान्यतः त्यामुळे अंत्यसंस्काराला मोठा विलंब होत नाही. प्रशिक्षित पथकाकडून ही प्रक्रिया अत्यंत आदरपूर्वक केली जाते. तिथल्या परिस्थितीनुसार ती रुग्णालयात किंवा दात्याच्या घरी केली जाऊ शकते. संकलनानंतर कुटुंबीय अंत्यसंस्काराची प्रक्रिया पुढे सुरू करू शकतात. म्हणूनच नेत्रदानामुळे अंत्यसंस्काराच्या विधींवर परिणाम होतो, हा गैरसमज कुटुंबीयांनी बाळगू नये."

5. चष्मा वापरणारे, मधुमेह असलेले किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेले लोक नेत्रदान करू शकतात का?

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते अनेक प्रकरणांमध्ये असे लोक नेत्रदान करू शकतात.

चष्मा वापरणं म्हणजे नेत्रदानासाठी तात्काळ अपात्र असं ठरत नसतं. तसंच मधुमेह किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तर ती व्यक्ती आपोआप अपात्र असं ठरत नसतं.

संबंधित नेत्रपेढीच त्या व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास आणि कॉर्नियाची स्थिती तपासून प्रत्यारोपणासाठी त्याचा वापर करता येईल की नाही, हे ठरवते. त्यामुळे एखादी व्यक्ती नेत्रदानासाठी अपात्र आहे, असं कुटुंबीयांनी स्वतःहून गृहीत धरू नये.

कमी किंवा जास्त नंबरचा चष्मा लागणं, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा पूर्वी डोळ्यांवर शस्त्रक्रिया झालेली असणं यांमुळे नेत्रदान करता येत नाही, असा समज चुकीचा आहे.

चष्मा

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. हेमंत कांबळे म्हणाले, "चष्मा वापरणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत हा आणखी एक मोठा गैरसमज आहे. जवळचं किंवा दूरचं दिसण्यासाठी लागणारा चष्मा किंवा अॅस्टिग्मॅटिझम यांचा कॉर्नियाच्या प्रत्यारोपणयोग्यतेशी थेट संबंध नसतो. कारण दृष्टीदोष हा डोळ्याच्या आकाराशी संबंधित असतो, तर प्रत्यारोपणासाठी कॉर्नियाची पारदर्शकता आणि आरोग्य महत्त्वाचं असतं."

डॉ. कांबळे सांगतात, "मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा दमा असलेल्या व्यक्तीदेखील नेत्रदान करू शकतात. मृत्यूच्या वेळी गंभीर संसर्गजन्य किंवा रक्ताद्वारे पसरणारा आजार नसल्यास त्यांचे डोळे स्वीकारले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली असणेही नेत्रदानासाठी अडथळा ठरत नाही. कारण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया डोळ्याच्या भिंगावर (लेन्स) केली जाते, तर प्रत्यारोपणासाठी वापरला जाणारा कॉर्निया हा वेगळा भाग असतो."

"मोतीबिंदू किंवा काचबिंदूवर उपचार घेतले असतील तर नेत्रदान करता येत नाही, नेत्रदानासाठी वयोमर्यादा असते किंवा भारतीय दात्यांचे कॉर्निया प्रत्यारोपणासाठी कमी दर्जाचे असतात, असे काही इतर गैरसमजही समाजात आढळतात. मात्र यापैकी कोणतीही गोष्ट खरी नाही. नेत्रदानाबाबत योग्य माहिती आणि जागरूकता वाढल्यास अधिक लोक या कार्यात सहभागी होऊ शकतील."

6. नेत्रदान केल्यावर चेहरा विद्रूप होतो? पुढच्या जन्मात अंधत्व येतं?

नेत्रदानाबाबतचा पहिला मोठा गैरसमज म्हणजे नेत्रदान केल्यामुळे मृत व्यक्तीच्या चेहरा विद्रूप होतो प्रत्यक्षात हे पूर्णपणे चुकीचं आहे. नेत्रसंकलनाची प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक केली जाते आणि त्यानंतर पापण्या बंद केल्या जातात. त्यामुळे चेहऱ्याच्या दिसण्यात कोणताही बदल होत नाही.

दुसरा प्रचलित गैरसमज म्हणजे या जन्मात डोळे दान केल्यास पुढच्या जन्मात अंधत्व येते. मात्र याला कोणताही वैज्ञानिक किंवा धार्मिक आधार नाही. उलट, नेत्रदान हे एक परोपकाराचं कार्य मानलं जातं. ज्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला पुन्हा दृष्टी मिळू शकते.

नेत्रदानाबाबतचे हे गैरसमज तुम्हालाही आहेत का? जाणून घ्या सत्य

फोटो स्रोत, Getty Images

स्त्री-पुरुष, धर्म, रक्तगट किंवा आर्थिक पार्श्वभूमी यांची पर्वा न करता जवळपास प्रत्येकजण नेत्रदान करू शकतो. नेत्रदानासाठी कोणतीही वयोमर्यादा (अप्पर लिमिट) नाही. एक वर्षापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. कारण नेत्रदानासाठी वयापेक्षा डोळ्यातील ऊतींची गुणवत्ता आणि आरोग्य अधिक महत्त्वाचे असते.

डॉ. हेमंत कांबळे सांगतात, "काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये नेत्रदान स्वीकारलं जात नाही. एड्स, हिपॅटायटिस बी किंवा सी, रेबीज, सेप्टिसीमिया, तीव्र ल्युकेमिया, धनुर्वात, कॉलरा, मेंदूज्वर (मेनिंजायटिस) किंवा एन्सेफलायटिस यांसारख्या संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त व्यक्तींचे डोळे दानासाठी स्वीकारले जात नाहीत. तसेच डोळ्यांमध्ये सक्रिय दाह, रेटिनोब्लास्टोमा किंवा मॅलिग्नंट मेलेनोमा यांसारखे आजार असतील तरही नेत्रदान करता येत नाही."

7. नेत्रदानाचा किती व्यक्तींना फायदा होऊ शकतो?

सामान्यपणे एका नेत्रदात्यामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, कारण प्रत्येक डोळ्यातील एक कॉर्निया एका रुग्णासाठी प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे एका दात्याच्या दोन कॉर्नियांमधून दोन वेगवेगळ्या व्यक्तींवर प्रत्यारोपण करणं शक्य होतं.

नेत्र

फोटो स्रोत, Getty Images

मात्र आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आणि कॉर्नियाचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी तयार केलेल्या पद्धतींमुळे ही संख्या वाढू शकते. लेमेलर प्रत्यारोपण (Lamellar Procedures) किंवा अंशतः ऊतींच्या प्रत्यारोपणासारख्या तंत्रांमुळे एका नेत्रदात्याच्या कॉर्नियातून तीन किंवा त्याहून अधिक रुग्णांनाही फायदा होऊ शकतो.

म्हणजेच भारतात दरवर्षी मृत्यू पावणाऱ्या सुमारे एक कोटी लोकांपैकी अगदी थोड्या लोकांनीदेखील नेत्रदानाचा संकल्प केला, तरी कॉर्निया प्रत्यारोपणासाठी असलेली मागणी आणि उपलब्धता यांतील दरी काही वर्षांत मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळेच जनजागृती मोहिम, विशेषतः राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

8. कॉर्निया प्रत्यारोपणाला कितपत यश मिळतं?

कॉर्निया प्रत्यारोपणाचं यश मुख्यतः प्रत्यारोपणाची गरज का निर्माण झाली होती यावर अवलंबून असते. तुलनेनं कमी जोखमीच्या आजारांमध्ये परिणाम अत्यंत चांगले दिसून येतात. उदाहरणार्थ, केरॅटोकोनस असलेल्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपणानंतर पाच वर्षांनी ग्राफ्ट टिकून राहण्याचे प्रमाण सुमारे 93 टक्के, तर कॉर्नियल डिस्ट्रॉफी असलेल्या रुग्णांमध्ये सुमारे 89 टक्के नोंदवले गेले आहे, असं डॉ. हेमंत कांबळे सांगतात.

ते पुढं म्हणाले, "गुंतागुंत नसलेल्या आणि कमी जोखमीच्या रुग्णांमध्ये पाच वर्षांनंतर ग्राफ्ट टिकून राहण्याचे प्रमाण 95 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. यामागे एक महत्त्वा;x कारण म्हणजे कॉर्नियाला शरीरात काही प्रमाणात 'इम्यून प्रिव्हिलेज' (रोगप्रतिकारक यंत्रणेपासून तुलनेने संरक्षण) लाभलेलं असतं. त्यामुळे इतर अनेक अवयव प्रत्यारोपणांच्या तुलनेत कॉर्निया प्रत्यारोपणानंतर नकार (rejection) येण्याचा धोका तुलनेने कमी असतो."

डॉ. हेमंत कांबळे यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. ते सांगतात,"जगभरातील सर्व प्रकारच्या कॉर्निया प्रत्यारोपणांचा विचार केला तर, प्रत्यारोपणानंतर एक वर्षानं ग्राफ्ट टिकून राहण्याचं प्रमाण सुमारे 88.6 टक्के आहे. हे प्रमाण पाच वर्षांनी 72.8 टक्क्यांपर्यंत आणि दहा वर्षांनी 61.2 टक्क्यांपर्यंत घटतं."

"गंभीर संसर्गामुळे डोळा वाचवण्यासाठी करण्यात येणाऱ्या आपत्कालीन उपचारात्मक (therapeutic) कॉर्निया प्रत्यारोपणांचं यश मात्र वेगळ्या निकषांवर मोजले जाते. अशा प्रकरणांमध्ये उद्दिष्ट परिपूर्ण दृष्टी मिळवून देणं नसून डोळा वाचवणे हे असते. या दृष्टीने अशा शस्त्रक्रिया बहुतांश वेळा यशस्वी ठरतात."

"अलीकडे विकसित झालेल्या लेमेलर प्रत्यारोपण तंत्रांमध्ये (Lamellar Transplantation) कॉर्नियाचा फक्त खराब झालेला थर बदलला जातो. त्यामुळे रुग्णांची दृष्टी पूर्ववत होण्याचा वेग अधिक जलद असतो. तसंच दीर्घकालीन यशाचं प्रमाणही संपूर्ण जाडीचा (full-thickness) कॉर्निया प्रत्यारोपणाइतकेच किंवा त्याच्या जवळपास असल्याचे आढळून आलंय."

9. नेत्रदानासाठी नोंदणी कशी करायची?

नेत्रदानासाठी नाव नोंदवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. नेत्रदानाचा संकल्प करणारी व्यक्ती प्रमुख रुग्णालयं, नेत्रपेढ्या (Eye Banks) येथे उपलब्ध असलेला प्रतिज्ञापत्र फॉर्म भरू शकते किंवा ऑनलाइन नोंदणी करू शकते. याशिवाय, सरकारच्या NOTTO (National Organ and Tissue Transplant Organization) पोर्टलद्वारे किंवा जवळच्या मान्यताप्राप्त नेत्रपेढीतही नोंदणी करता येते.

या प्रक्रियेसाठी आगाऊ वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नसते आणि कोणत्याही टप्प्यावर शुल्कही आकारले जात नाही. मात्र, एक महत्त्वाची गोष्ट अनेकजण विसरतात. नेत्रदानाचा संकल्प केल्यानंतर त्याबद्दल आपल्या कुटुंबीयांना माहिती देणं अत्यंत आवश्यक असतं.

नेत्रदानासाठी नोंदणी कशी करायची?

फोटो स्रोत, Getty Images

कारण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केवळ नेत्रदानाचे कार्ड किंवा नोंदणी पुरेशी ठरत नाही. प्रत्यक्षात नेत्रसंकलनासाठी जवळच्या नातेवाईकांची किंवा कुटुंबीयांची संमती आवश्यक असते. त्यामुळे जिवंतपणी घेतलेला नेत्रदानाचा निर्णय कुटुंबीयांना सांगितल्यास मृत्यूनंतर त्याची अंमलबजावणी करणं सोपं होतं.

म्हणूनच नेत्रदानाची नोंदणी करण्याइतकंच आपल्या कुटुंबीयांशी याबाबत स्पष्टपणे संवाद साधणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मृत्यूनंतर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते आणि एखाद्या गरजू व्यक्तीला पुन्हा दृष्टी मिळवून देण्यास मदत होऊ शकते.

डॉ, रश्मी बर्वे सांगतात, "नेत्रदानाचा निर्णय साधा असला तरी त्याचा दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर कायमस्वरूपी सकारात्मक परिणाम होऊ शकतो. एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकते. त्यामुळे प्रत्येकानं नेत्रदानाबाबत योग्य माहिती जाणून घ्यावी, आपल्या कुटुंबीयांशी याबाबत चर्चा करावी आणि नेत्रदानाची प्रतिज्ञा करण्याचा विचार करावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्या नेत्रदानाच्या इच्छेबद्दल कुटुंबीयांना माहिती असणं आवश्यक आहे."

10. नेत्रदान मोहिमेसमोरचे मोठे अडथळे कोणते?

नेत्रदानासमोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे जनजागृतीचा अभाव. आजही अनेकांच्या मनात नेत्रदानामुळे मृत व्यक्तीचं शरीर विद्रूप होतं किंवा एखाद्या धर्मात नेत्रदानाला परवानगी नाही, अशा समजुती आढळतात. अनेकदा ज्या व्यक्तीनं जिवंतपणी नेत्रदानाचा संकल्प केलेला असतो, त्याच्या कुटुंबीयांमध्येही असे गैरसमज असल्याने नेत्रदानाची प्रक्रिया प्रत्यक्षात येत नाही.

डॉ. कांबळे सांगतात, "पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नेत्रपेढी व्यवस्थेमध्ये काही महत्त्वाच्या उणिवा आहेत. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागात नेत्रदानाशी संबंधित सेवा अधिक उपलब्ध आहेत. अनेक ग्रामीण भागांत नेत्रसंकलनाच्या सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रणा मर्यादित प्रमाणात आहेत.

याशिवाय, काही देशांमध्ये रुग्णालयात झालेल्या प्रत्येक मृत्यूची माहिती नेत्रपेढींना देणे बंधनकारक असते. मात्र भारतात अशी व्यवस्था सर्वत्र लागू नाही. त्यामुळे नेत्रदान शक्य असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये कुटुंबीयांपर्यंत नेत्रदाना��ा पर्याय पोहोचतच नाही."

"मोठ्या वैद्यकीय संस्थांबाहेर प्रशिक्षित नेत्रसंकलन तंत्रज्ञ, शोकाकुल कुटुंबीयांना समुपदेशन करणारे तज्ज्ञ आणि कॉर्नियाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आवश्यक आधुनिक सुविधा यांचीही कमतरता आहे. तसेच कॉर्निया प्रत्यारोपण करणाऱ्या तज्ज्ञ शल्यचिकित्सकांची संख्या मर्यादित असल्याने संकलित झालेल्या सर्व ऊतींचा वेळेत आणि प्रभावीपणे वापर करणं नेहमीच शक्य होत नाही. त्यामुळे नेत्रदान वाढवण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक आरोग्य व्यवस्था आणि पायाभूत सुविधाही मजबूत करणे तितकेच आवश्यक ठरतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)